जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांचा अल्पपरिचय -
श्रीक्षेत्र नाणीजधाम हे जगद्गुरुश्रींचे जन्मस्थान आहे. महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात नाणीज या गावी अश्विन शुद्ध अष्टमी विक्रम सवंत 2006 भृग वासरे, शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 1966 रोजी रात्रौ 10 वाजता जगद्गुरुश्रींचा जन्म झाला. बुलढाणा जिल्हयातील शेगाव निवासी संत शिरोमणी गजानन महाराज हे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे आराध्य दैवत आहेत. संत शिरोमणी गजानन महाराजांच्या आज्ञेने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कणेरी गावी लिंगायत पीठाचे 26 वे मठाधिपती समर्थ सद्गुरु काड्सिध्देश्वर महाराज (मुपिन काड्सिध्देश्वर) यांच्याकडून अनुग्रह घेतला. समर्थ सद्गुरु काड्सिध्देश्वर महाराज आत्मज्ञानी सत्पुरुष होवून गेले. या संप्रदायाला आत्मज्ञानी सत्पुरुषांची गुरुपरंपरा असून, भगवान दत्तात्रय हे या संप्रदायाचे आद्य गुरु आहेत.
वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य आणि जगद्गुरु शंकराचार्य ही सर्वोच्च पदे असून त्यातील ‘जगद्गुरु रामानंदाचार्य’ या पदावर अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेने २१ ऑक्टोबर २००५ साली विराजमान केले आहे. तसेच श्रीक्षेत्र नाणीजधामला "जगद्गुरु रामानंदाचार्य पीठ" म्हणून घोषित करून वैष्णव पंथाचे दक्षिण भारतातील प्रमुख पीठ निर्माण करण्यात आले.
प.पू. जगद्गुरुश्रींचे नाव आता "अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज" असे झाले आहे.
स्वतः जगद्गुरुश्री गृहस्थाश्रमी असून त्यांनी संपूर्ण भारत देशात, तसेच विदेशातही हा स्व-स्वरुप संप्रदाय पसरविलेला आहे. मन अध्यात्मवादी, डोळे विज्ञानवादी, बुध्दी वास्तववादी ठेवा ही जगद्गुरुश्रींची त्रिसूत्री शिकवण आहे.
या स्व-स्वरूप सांप्रदायाचे प्रमुख पीठ श्रीक्षेत्र नाणीजधाम असून भारतातील अनेक राज्यांमध्ये उपपीठे आहेत. या प्रत्येक पीठावर दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी विनामूल्य सामाजिक उपक्रम राबवून समाजाची सेवा केली जाते.